Friday, 7 May 2021

जरा सांभाळून जा सांत्वनाला

जरा सांभाळून जा सांत्वनाला.... 

       मी फेसबुकवर मानसशास्त्राची प्रॅक्टीस सहसा आणत नाही..कारण हे माध्यम माझा विरंगुळा आहे.पण आज एका मुद्द्यावर लिहायचेच ठरवलेय..
        गेल्या संपूर्ण शतकाने न पाहिलेले संकट आज आपण पाहत आहोत.ज्यांच्यावर आभाळ कोसळलेय ते तर दुःखात आहेतच पण आसपास घडणा-या घटनाही विदिर्ण करताहेत..
        अतिदक्षताविभाग,हाॅस्पिटलची दारे ,आणि बंदिस्त घरातून लोक एकामेकांशी फोनवर बोलत आहेत.काल एका कार्पोरेट ऑफीसमधील उच्चाधिका-यांसोबत एक मिटींग झाली. HRD मधील कर्मचा-यांना फोनवर बोलून बोलून ताण येत आहे.त्या ताण समायोजनासाठी कार्यशाळा आयोजित करायचे ठरत आहे..ऑफीसमधे येणारे फोन हे मदतीसाठी,सुविधांसांठी आणि अखेरीस दुर्दैवाने वाईट बातमी घेऊन येत आहे पण आज याच फोन मधल्या ह्या वाईट बातमीच्या सांत्वनावर बोलू आपण..कारण आयुष्यात कधी ना कधी आपणही असे फोन किंवा भेटी घेतोच.
            मृत्यू ह्या घटनेचे दुःख अतीव आणि अंतीम टोक आहे पण एकूणच दुःख हे दुःख आहे.सहासात वर्षाच्या लहान मुलीची बाहुली हरवण्याचे दुःख ही तिच्या दृष्टीने फार मोठे असते..
    दुःख झेलण्याची त्या दुःखाशी समायोजन करण्याची प्रत्येकाची वेगळी क्षमता असते..स्वीस-अमेरिकन मानसोपचारतज्ञ एलिझाबेथ कुबल्रर-राॅस हिने 1969 साली प्रकाशित तिच्या"On death and Dying"ह्या पुस्तकात दुःखाच्या अवस्था नोंदवल्या आहेत.विरह,प्रेमभंग,नुकसान किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू हि सारी दुःखे माणसाला पाच अवस्थांमधून नेतात..
-नकार..
-राग
-तडजोड
-ताण
-स्वीकार
  ह्या सा-या अवस्थामधली मनाची बदलणारी अवस्था आणि सांत्वनाची भाषा हे पाहूयात.
                माझ्याबरोबर हे होणे शक्यच नाही..किंवा झालेलेच नाही असे म्हणून माणसाचे मन घटना संपूर्णतः नाकारण्याचा प्रयत्न करते.हि सुरुवातीची अवस्था दुःखाची प्राथमिक पण गंभीर अवस्था आहे.
ही मनाचे Defense Mechnism आहे..दुःखातून सावरण्यासाठी मदतच होते.
दुस-या अवस्थेत (Anger-राग)आपल्याबरोबर जे झाले ते चूक आणि अन्यायकारक असल्याची भावना तीव्र असते. ह्या अवस्थेतील माणूस रागाने आदळआपट करतो असे नाही पण ह्या दुःखात आपण एकटे सोसत असल्याची जाणीव तीव्र असते.
तिसरी अवस्था तडजोड(bargain) जिथे दुःख सांगण्याची ,शेअर करण्याची गरज निर्माण होते .घटनेबद्दल पुन्हापुन्हा बोलून मोकळे व्हावेसे  वाटते.
चौथी अवस्था (Depression-ताण) ह्या अवस्थेत घटनांचा ताण मनाला जाणवू शकतो.दुःखाचे वेगवेगळे कंगोरे मनाला त्रास देऊ लागतात.आधीच्या
तडजोडीच्या अवस्थेत योग्य समायोजन  न झाल्यास ताण वाढून जास्त काळ राहणे घातक ठरु शकते.
ह्या सा-या अवस्था पार करुन झालेले नुकसान(Loss)  मान्य करुन माणूस Acceptance (स्वीकार)ह्या अवस्थेपर्यंत पोहचतो.
नकारापासून ते व्यक्ती जगात नाहीये हे मान्य करणे ,घटना मान्य करणे हि अखेरची अवस्था आहे.ह्या अवस्था पार सगळेच करतात पण प्रत्येकाला लागणारा वेळ वेगळा असतो.प्रत्येकाची समायोजन क्षमता (coping ability)वेगवेगळी असते.कुणाला एक आठवडा लागेल तर कुणालासहा महिने.पण ह्या सा-या अवस्थांमध्ये गेलेल्या माणसाला पूर्णपणे विसरण्याची ,आयुष्यातून वजा करण्याची कुणाचीही इच्छा नसते..आणि नसली तरी हरकत नाही.आपण गेलेल्या माणसांना पूर्ण विसरतो का कधी.त्यांना आपल्या मनात आठवणीच्या रुपात जिवंत राखत जगायला शिकवतात ह्या अवस्था. 
      आयुष्याचा भाग असलेले माणूस अचानक अदृश्य होतो आणि सांत्वनाला येणारे लोक सहज म्हणतात,"Move On"तुला विसरायला हवे"
ज्याच्या आयुष्यातून प्रिय व्यक्ती गेली आहे त्याला move on व्हायचेच नसते..तो माणूस आजन्म आठवणीत तरी जिवंत ठेवायचा असतो.त्यामुळे असा सल्ला जिव्हारी लागतो.
काही वाक्ये आपल्याकडे ह्यासाठी बोलली जातात, कारण काय बोलायचे हे माहितच नसते..
   "तू अजून तरुण आहेस..पुढे आयुष्य पडलेय..."
जखमेवर मीठ आहे हे..आपण ह्या गोष्टीकडे सहवेदनेतून पहा..तुमच्या स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या मृत्यनंतर तो तुम्हाला किंवा तुम्ही त्याला विसरु शकाल का?
    "तरी बरे हा एकटाच मुलगा नाही दुसरे मूल आहे"
दुसरे मूल असल्याने आईचे दुःख कमी होईल का??
"आज शेवटचे रडून घे....", हे शक्य आहे का जवळच्या माणसाला??
             एक स्त्री आपल्या मैत्रिणीला रोज आपले दुःख उगाळून सांगत होती..ऐकून कंटाळलेली मैत्रीण म्हणाली.."ह्यापुढे मला हे दुःख ऐकवू नकोस,ह्यातून बाहेर पड' त्या दिवशी ती मैत्रीण मैत्रीतून बाहेर पडली.कान देण्याचे नाकारल्याने वेदना वाढली,द्विगुणित झाली..
   दुःखात असलेल्या माणसाला त्याचे गेलेले माणूस ,वस्तू घटना सोडवत नसते,पण त्या दुःखात सोबत हवी असते..ते गेलले हरपलेले जपून ठेवत आत जिवंत ठेवत जगायचे असते..
       वीस एक वर्षापूर्वी एक तरुण मुलगा अपघातात गेलेले जोडपे पाहिलेय..ह्या सगळ्या अवस्थांमधून पार गेलेले..पण सरता सरता दुःखाला देखणे वळण  मिळाले.मुलाच्या आठवणीत अनाथआश्रमातील एक मूल शिक्षणासाठी दत्तक घेतले गेले,दिवंगत मुलाच्या नावाने स्काॅलरशिप दिली गेली. वेदनेला वेळ दिला आणि संयमाने संतुलित कान दिला तर दुःख देखण्या वळणावर एक घरटे बांधते.वर्षातला एखादा दिवस थोडेसे हळवे होत त्या आठवणीच्या घरट्यात असलेले माणूस जिवंत दिसते..आणि राहिलेल्या माणसाचे जगणे सुकर होते..
         सध्या कठीण काळ आहे...मृत्युचे तांडव सुरु आहे.इथे एकाच मृत्यूचे ओझे इतके काही दाखवते..आणि एकाच कुटुंबात एकपाठोपाठ होणारे मृत्यु सावरायला वेळ मागतील.
आपणच भवतालचे आपले जिवलग जपायला हवेत..म्हणूनच जपून जा सांत्वनाला...फोनवर सुद्धा तुमचे मौन आणि सुहृदाचे अश्रूच बोलू द्यात. 

हा लेख आवडल्यास,उपयोगी वाटल्यास नक्की कळवा..पुढच्या लेखात सांत्वन करताना येणा-या ताणावर बोलूयात. 

नूतन योगेश शेटे
मानस-समुपेशिका 
9822841226